नाशिक – विशेष प्रतिनिधी
ऋतुरंग आणि स्वरांगण या संस्थेतर्फे स्वरांगण संगीत गुरुकुल स्थापन करण्यात आले आहे. नाशिकरोड मधील हे पहिलेच गुरुकुल असून ज्येष्ठ गायक व गुरु पंडित शंकरराव वैरागकर आणि ऋतुरंगचे अध्यक्ष विजय संकलेचा यांच्या हस्ते गुरुकुलाचे उद्घाटन झाले.
नाशिकरोड मध्ये चांगल्या दर्जाची विद्या या गुरुकुलातून विद्यार्थ्यांना मिळत राहील आणि चांगले संगीत साधक या गुरुकुलातून कलाकार म्हणून निर्माण होतील असा विश्वास प्रख्यात गायक पं. शंकरराव वैरागकर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी अभिजीत भाटजीरे, चैतन्य विसपुते, स्वरांगी बिडवई, साक्षी अनवडे, भक्ती नांदुर्डीकर आणि धनश्री सिमंत यांनी तू बुद्धी दे तू तेज दे ही प्रार्थना सादर केली.

गुरुकुल शिक्षण पद्धती हा आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि गुरु शिष्य परंपरेचा आत्मा आहे आणि तो पुढे नेण्याचा प्रयत्न ऋतुरंग आणि स्वरांगणमार्फत होत आहे. चांगल्या दर्जाची विद्या ही तळागाळातल्या आणि दुर्गम भागातल्या मुलांपर्यंत पोहोचावी हाच उद्देश या गुरुकुलाचा आहे असे प्रास्ताविक स्वरांगणचे संस्थापक अध्यक्ष सागर कुलकर्णी यांनी केले. गोपाळ मोजाड यांनी निवेदन केले..!!
हिंदुस्तानी शास्त्रीय गायन, हार्मोनियम आणि तबला हे विषय या गुरुकुलात शिकविले जाणार आहे तरी या गुरुकुलाचा लाभ सर्व नाशिककरांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष संगीत कुलकर्णी यांनी केले आहे.
शुभारंभाप्रसंगी ऋतुरंगचे संतोष जोशी, सुभाष पाटील, प्रकाश पाटील, वसंतराव नगरकर, स्वरांगणचे प्रफुल्ल कुलकर्णी, नामदेव गाढवे, संतोष खडके, राहुल हिंगे, ज्ञानेश्वर कर्पे, गोपाळ मोजाड, विलास सोनवणे, श्याम अष्टेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

























