नाशिक – विशेष प्रतिनिधी
संगीत ही नव्या जाणिवांची अभिव्यक्ती असून, ती मनाशी नाते सांगते. संगीताची भाषा ही स्वतःशी आणि समूहाशी सहज संवादातून घडते. त्यामुळे संगीतसाधना ही अविरत चालणारी प्रक्रिया असून, ती केवळ सादरीकरण नसून आत्मानुभूतीसाठीही असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ध्यास आणि ध्येय घेऊन आपली वाटचाल करावी व कला क्षेत्रात भविष्य घडवावे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध तबलावादक पं. नितीन वारे यांनी केले.
“संगीताचे शिक्षण हे केवळ रियाजापुरते मर्यादित न ठेवता त्यातून जीवनदृष्टी विकसित करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. निरंतर प्रयत्न, गुरूंचे मार्गदर्शन आणि शिष्याची निष्ठा यामधून खरी संगीतसाधना घडते, असेही पं. वारे म्हणाले. कुमार वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ‘सूरविश्वास कुमारमंच’चे बारावे पुष्प विश्वास बँक डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास बँकेसमोर, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाले त्यावेळी मार्गदर्शन करताना पं. नितीन वारे बोलत होते.
व्हिजडम हाय इंटरनॅशनल स्कूल, नाशिक गोवर्धन कॅम्पसच्या विद्यार्ध्यानी सहभाग घेतला. शौर्या पवारचे शास्त्रीय गायन संपन्न झाले. तिने राग भिम पलासी सादर केला. त्यात बंदिश व तराणा होता. सोलो तबला वादन युगम ओस्तवालने केले व्हिजडम हाय इंटरनॅशनल स्कूल, नाशिक गोवर्धन कॅम्पसच्या विद्यार्थ्यांचे समुह शास्त्रीय गायन झाले. त्यात सौम्या जगताप, हेमन्या केशरी, शांभवी राऊत, प्रयाग बागड, कनका चंद्रात्रे, नील गावले, काव्या कांकरीया, अबिक जाना निरवी ब्राह्मणकर , देविका बैजू हे सहभागी झाले. अंबे अंबिके जगदंबिके व आनंद घन ही गीते सादर केली. तबला साथसंगत अमित भालेराव तसेच हार्मोनियम साथसंगत रागेश्री धुमाळ तर गिटार साथसंगत सुमेश सुरेंद्रन यांनी केली. सुरज बारी या गुरूंच्या मार्गदर्शनाने ही मैफल संपन्न झाली.
सूत्रसंचलन विनया देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजक विश्वास लिलावती जयदेव ठाकूर, ऋचिता ज्योती विश्वास ठाकूर, संकल्पक विनायक आशा पुरूषोत्तम रानडे आहेत. सदर कार्यक्रमास विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा जलालपूर, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास टर्फ, ग्रंथ तुमच्या दारी यांचे सहकार्य लाभले.

























