नाशिक – (विशेष प्रतिनिधी)
गुन्हे दोषसिध्दीच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी तसेच नविन कायद्यांच्या अनुषंगाने सहायक अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, सहायक सरकारी अभियोक्ता तसेच जिल्हा सत्र न्यायालयात कामकाज करणारे कोर्ट पैरवी व अंमलदार यांच्या चर्चासत्राचे नुकतेच पोलीस आयुक्तालयात आयोजन करण्यात आले होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून हे चर्चासत्र घेण्यात आले.
याप्रसंगी विशेष सरकारी वकील व जिल्हा सरकारी वकील अजय मिसर, सहा संचालक व सरकारी अभियोक्ता अनिल बागले तर शहर पोलीस आयुक्तालयाचे वतीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, किशोर काळे, (परिमंडळ-२), सहायक आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, अभियोग कक्षाचे प्रभारी अधिकारी अतुल पाटील उपस्थित होते. या चर्चासत्रास जिल्हा सत्र न्यायालय येथे कामकाज पहाणारे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात कामकाज पहाणारे सहायक सरकारी अभियोक्ता, विशेष सरकारी अभियोक्ता, आणि पोलीस ठाण्यांचे काम करणारे कोर्ट पैरवी अंमलदार, अभियोग कक्षाकडील अधिकारी व अंमलदारही उपस्थित होते. 

चर्चासत्रा दरम्यान उपस्थित सरकारी अभियोक्ता यांनी जिल्हा न्यायालयातील दोषसिध्दीचे प्रमाणात वाढ तसेच न्यायालयात मुद्देमाल, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा कडील अहवाल, साक्षी समन्स-वॉरन्ट, जामिन अर्ज अहवाल, याबाबत उपाययोजना सांगून मार्गदर्शन केले. बदलत्या काळानुसार अंमलात आलेले नविन कायद्यांचे अंमलबजावणी व कायद्याचे ज्ञान या बाबत मार्गदर्शन केले. चर्चासत्रानंतर सर्व सरकारी अभियोक्ता तसेच माननीय न्यायालयात कामकाज करणारे कोर्ट पैरवी अंमलदार यांना यापुर्वी न्यायालयात केलेल्या चांगल्या प्रशंसनीय कामगिरी करीता प्रशंसापत्र देऊन, भविष्यांत देखील चांगली कामगिरी करावी बाबत गौरविण्यांत आले.

























