नाशिक – विशेष प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या पोलीस दलात उल्लेखनीय तसेच गुणवतापूर्ण कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये नाशिक शहर पोलीस दलातील मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. अचल मुदगल व नव्याने अस्तित्वात आलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वास पाटील यांचा समावेश आहे. या बहुमानाबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतूक केले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी राज्य पोलीस दलात ३४ वर्ष उल्लेखनीय व निष्कलंक सेवा बजावली. नाशिक शहर पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनी विविध पोलीस ठाणे व विभागात आपल्या कर्तबगारीची नोंद केली. त्यानंतर उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक, पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य निभावताना गुन्ह्यांना प्रतिरोध, गुन्ह्यांची उकल करणे तसेच पोलिसिंग याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. छत्रपती संभाजीनगर येथे आर्थिक गुन्हे शाखा व सायबर सेल मध्ये काम करताना तांत्रिक व तपासात्मक कौशल्याच्या आधारे क्लिष्ट अशा गुन्ह्यांची उकल केली. त्यात बहुचर्चित केबीसी घोटाळा, नवजीवन कंपनी गुन्हा, नायजेरियन फ्रॉड आदींचा यशस्वी तपास करताना परीपूर्ण दोषारोपपत्र न्यायालयात सादर करून आरोपींना शिक्षेप्रत पोहचवले.
सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात जबाबदारी निभावताना श्री. पाटील यांनी बलात्कार व खून यासारख्या संवेदनशील गुन्ह्याचा कौशल्याने तपास करून सहाजणांना जन्मठेपच्या शिक्षेप्रत पोहचवले. श्री. पाटील यांनी उकल केलेल्या गुन्ह्यातील खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना १० वर्ष सक्तमजुरी तर दुसऱ्या एका गुन्ह्यात सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा लागलेली आहे. सिल्लोडमधील एका गुन्ह्यात त्यांनी स्फोटके हस्तगत करण्यात यश मिळवले होते. श्री. पाटील यांना पोलीस सेवेत आजवर २१ प्रशस्तिपत्र व २६८ बक्षिसे मिळाली आहेत. सन २०२० मध्ये पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले होते.

























