पंचवटी – विशेष प्रतिनिधी
श्रावणातील पहिल्या सोमवारची पर्वणी साधत हजारो शिवभक्तांनी गोदास्नान व श्री. कपालेश्वर महादेवाचे दर्शन असा योग साधला. यामुळे गंगाघाट काल शिवभक्तांनी फुलला होता. सायंकाळी निघालेल्या श्री कपालेश्वर पंच मुखी महादेव सोमवार पालखी दर्शनासाठीही भाविकांची गर्दी उसळली होती. यावेळी बम् बम् भोले व हर हर महादेवच्या घोषणांनी गोदाघाट दुमदुमला होता.
विविध सण आणि व्रतवैकल्ये करण्यासाठी पवित्र मानला गेलेला श्रावण महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे या महिन्यात शिवभक्त उपवास, पूजा आणि अभिषेक करतात. श्रावण महिन्यात धार्मिक कार्यांना विशेष महत्व असून या महिन्यात वैदिक पूजा, धार्मिक विधी केल्याने भक्तांना सुख, शांती, समृद्धी आणि मोक्ष मिळतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी गोदाघाटावरील विविध शिवमंदिरात आबालवृद्ध भाविकांची गर्दी उसळली होती.

(सर्व छायाचित्रे – अथर्व फोटो)
श्री. महादेव कपालेश्वर मंदिरात गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संस्थानने विशेष व्यवस्था केली होती. महादेवाच्या पिंडीभोवती केलेली विविध फळांची भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. पहाटपासूनच स्त्री-पुरुष भक्तांनी दर्शन तसेच पूजाविधी करण्यासाठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. तर अनेक शिवभक्तांनी सालाबादप्रमाणे मंदिर प्रदक्षिणाही केली. सायंकाळी निघालेल्या श्री कपालेश्वर पंच मुखी महादेव सोमवार पालखीचे ठिकठिकाणी स्वागत झाले. मंत्रोच्चार करणारे बाल ब्रम्हवृंद तसेच ढोल व झांज पथकाने पालखी सोहळ्याची रंगत वाढवली. श्री क्षेत्र रामकुंड येथे पंचमुखी मुखवट्याचे स्नान व आरती झाल्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता झाली. गंगापूर रोडवरील सोमेश्वर महादेव मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली. शहरातील सर्वच शिवमंदिरे श्रावणी सोमवारनिमित्त गजबजली होती.
या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील हे आपल्या कर्मचाऱ्यांसह गोदाघाट परिसरावर लक्ष ठेवून होते. मालेगाव स्टॅण्ड, लेवा पाटीदार भवन, ढिकले वाचनालय व खांदवे सभागृह येथून वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आल्याने भाविकांना निर्विघ्नपणे दर्शन व पूजाविधीसाठी जाता आले.




























