मथुरा – विशेष प्रतिनिधी
दुःखी लोकांची सेवा करणे हाच कलियुगातील सर्वश्रेष्ठ कर्मयोग आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक, युवासंत, गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांनी केले.
श्रीक्षेत्र गोवर्धन येथे सेवामार्गातर्फे आयोजित भागवत सप्ताहाच्या द्वितीय दिवशी गुरुपुत्र श्री. मोरे यांचा सत्संग पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कलियुगात भागवत ग्रंथाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, भागवत पारायणामुळे पितृदोषातून मुक्ती मिळतेच शिवाय संतती प्राप्ती आणि भक्ती वृद्धिंगत करण्याचे कार्य या सेवेतून घडते. महर्षी व्यासांनी भगवान गणेशाकडून भागवताचे अखंड लेखन करून घेतले. भागवत ग्रंथामध्ये चारही युगांचे वर्णन आणि मानव कल्याणाच्या विशेष सेवा सांगितल्या आहेत. भागवत सप्ताहाची सेवा तशी कठीण असून परमपूज्य गुरुमाऊली आज एकाच वेळी हजारो सेवेकऱ्यांकडून सामुदायिकपणे भागवत सप्ताहाची सेवा करून घेत आहेत.त्यामुळे या सेवेत सहभागी झालेले सारे सेवेकरी खरोखरच भाग्यवान आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सेवेकऱ्यांचा ज्ञान,भक्ती, कर्मयोग पूर्ण
भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत कलियुगात ज्ञान, भक्ती आणि कर्मयोग श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन केले आहे. आज परमपूज्य गुरुमाऊली हाच ज्ञान भक्ती आणि कर्मयोग सेवामार्गाच्या माध्यमातून समस्त सेवेकरी परिवाराकडून प्रत्यक्षात आचरणात आणताहेत असे विश्लेषणही त्यांनी केले.
भागवतावरील रसाळ निरुपणाचे कौतुक…
सेवामार्गाचे मुख्य याज्ञिकी दीपक मुळेशास्त्री यांच्या भागवतावरील रसाळ निरुपणाचे सेवेकऱ्यांकडून कौतुक होत आहे. भागवत ग्रंथात समाविष्ट असलेला नारायण कवच विधी काल शनिवारी सेवेकऱ्यांच्या संरक्षणासाठी घेण्यात आला. आज रविवारी संतान गोपाळ मंत्रानुष्ठान आणि श्रीकृष्ण दोलोत्सव साजरा करण्यात येणार आहे. पारायणाची सांगता ४जुलै रोजी महाविष्णु याग, श्रीचक्रराज श्रीयंत्र पूजन आणि सत्यनारायण पूजनाने होणार आहे.

























