नाशिक – विशेष प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या राष्ट्रपती पोलीस पदकांच्या यादीत शहर पोलीस दलाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांचाही समावेश आहे. पोलीस दलातील २९ वर्षांच्या खडतर सेवेत डॉ. मुदगल यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे फळ त्यांना या सन्मानामुळे मिळाले आहे.
डॉ. अंचल मुदगल हे दिनांक एक मे २००५ रोजी महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उप निरीक्षक या पदावर नियुक्त झालेले असून खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची नागपुर शहर येथे नियुक्ती करण्यात आली. त्यांनी २९ वर्षे उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा पोलीस विभागात बजावली असून गंभीर गुन्ह्यांचा तपास व उकल, गुन्हे प्रतिबंध व प्रशासन या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांच्या या कार्यकिर्दीत त्यांना ९५ प्रशस्तीपत्रे आणि ५१० बक्षिसे मिळाले आहेत.
सन २००६ मध्ये नागपूर शहरात परिविक्षाधीन पोलीस उप निरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी सोन साखळी चोरी प्रकरणातील आरोपीस अटक करून तीन गुन्ह्यांची उकल केली. तसेच सन २००८ मध्ये लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या संवेदनशील दुहेरी खून प्रकरणाची यशस्वी उकल केली होती.
सन २०१३ ते २०१७ या काळात प्रशिक्षण महाविद्यालयात (PTC) कार्यरत असताना त्यांनी ई-अकॅडमी प्रकल्प मनोभावे पूर्ण केला. सन २०१७ मध्ये पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाल्यानंतर नागपूर शहरातील गुन्हे शाखेत त्यांची बदली झाली. येथे त्यांनी सशस्त्र दरोडा, घरफोडी, दरोडा, सोन साखळी चोरी व खून यांसारख्या अनेक मोठ्या गुन्ह्यांची उकल यशस्वीरित्या केली. तसेच एनडीपीएस अर्थात अंमली पदार्थ प्रकरणात ३८,८८,५००/- किंमतीची ९५२ ग्रॅम ब्राउन शुगर जप्त करून महत्वाची कारवाई केली.
सन २०१९ ते २०२१ दरम्यान नाशिक शहरातील गंगापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केली तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकां दरम्यान कायदा व सुव्यवस्था यशस्वीपणे राखली. या काळात त्यांनी दोन संवेदनशील खून प्रकरणे उघडकीस आणली.
मध्यवर्ती गुन्हेशाखा, नाशिक शहर येथे कार्यरत असतांना बांगलादेशी घुसखोरीच्या प्रकरणात आठ बांगलादेशी परकीय नागरिकांना अटक करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच मालाविरुध्दचे २५ गुन्हे उघडकीस आणले असुन अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षा मार्फत ७५ अपहृत मुला-मुलींचा शोध घेवून अल्पवयीन बालकां संदर्भात दाखल असलेले अपहरणाचे गुन्हे उघडकीस आणुन उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

























