(बातमीतील छायाचित्र संग्रहित आहे)
नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहर व ग्रामीण भागात तसेच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या संततधारेमुळे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात अला आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच बुधवारचा बाजारही स्थलांतरीत करावा लागणार आहे.
पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपासून होत असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरणातून बुधवारी (दि.२०) सकाळी आठ वाजता ५०० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला. एक तासानंतर हा विसर्ग १५०० क्युसेक्स करण्यात आला. पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरणातून होणार विसर्ग तसेच सततचा पाऊस यामुळे गोदावरीतील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदाकाठी भरणारा बुधवारचा बाजार देखील भरू देऊ नये, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.

























