पंचवटी – प्रतिनिधी
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पंचवटी पोलिसांनी हाती घेतलेल्या ‘साफसफाई’ मोहिमेत दुसऱ्या दिवशी गुरूवारी (दि.९) नवीन आडगाव नाका, विजय नगर चौफुली, मीनाताई ठाकरे स्टेडियम, अमृतधाम चौक ते बळीमंदिर सर्विस रोडपर्यंत जेसीबीचा पंजा चालवण्यात आला. या मोहिमेत टवाळखोर व गुन्हेगारांची आश्रस्थाने असलेल्या तसेच अमली पदार्थ विक्रीच्या टपऱ्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या आदी काढण्यात आल्या आहेत.

पंचवटी पोलिसांनी बुधवार पासून गुन्हेगार व टवाळखोरांचे अड्डे असणाऱ्या अतिक्रमणाविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी आरटीओ ते मखमलाबाद लिंक रोडवरील बेकायदेशीर टवाळखोरांचे अड्डे, बेकायदेशीर अतिक्रमण, चायनीज अंडा भुर्जीच्या गाड्या, गुन्हेगारीला खतपाणी घालणारी ठिकाणे उद्ध्वस्त केल्याने नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले होते. या मोहिमेचा दुसरा टप्पा नवीन आडगाव नाका, विजय नगर चौफुली, मीनाताई ठाकरे स्टेडियम, अमृतधाम चौक ते बळीमंदिर सर्विस रोड परिसरात राबवण्यात आला.
पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे सुनिल पवार, उपनिरीक्षक सचिन चव्हाण गुन्हे शोध पथक व अधिकारी व कर्मचारी. महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील अतिक्रमण अधिकारी प्रवीण मोरे, अतिक्रमण कनिष्ठ लिपिक मिलिंद जाधव, टीमप्रमुख उमेश खैरे, नीलेश काळे, राजू साळुंखे, नंदू खांडरे, दत्ता आहेर, जिभाऊ गरुड आदी कर्मचारी सहभागी झाले होते. पोलीस व महापालिका यांच्या या मोहिमेमुळे गुन्हेगारीला पाठबळ देणाऱ्या राजकीय पदाधिकारी हतबल झाल्याचे बोलले जात आहे.
आडगाव, म्हसरूळ पोलिसांचे काय ?
विशेष म्हणजे केवळ पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच बुधवारपासून कारवाई सुरू आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या विभाजनानंतर अस्तित्वात आलेल्या आडगाव आणि म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारे कारवाई करावी अशी मागणी संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिक व्यक्त करू लागले आहेत. या परिसरातील खाद्य पदार्थांच्या गाड्या, पार्सल पॉईंटच्या नावाखाली चालवली जाणारी हॉटेल्स, शेड ही गुन्हेगार व अवैध धंद्यांची आश्रयस्थाने आहेत.

























