– के.के.वाघ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे सहकार्य…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यालयीन सुधारणा करण्याकरिता दिलेल्या १५० दिवसांच्या कृती आराखडा योजनेनुसार नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेकरिता आणि तत्पर मदतीकरिता नाशिक ग्रामीण पोलिसांनी व्हॉट्सअप चॅट बॉट बनविले आहे. त्यासाठी के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले आहे.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनात अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, यांची संकल्पना व देखरेखीखाली के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी सौरभ शिंदे निरज बावा, ओम निकम, श्रीनाथ कदम, यश वडनेरे यांनी अथक परिश्रम करुन आणि तांत्रिक कौशल्याचा व्यावसायिक वापर करुन ‘रक्षक एआय’ या नावाचे व्हॉट्सअप चॅट बॉट तयार केले आहे. हे चॅट बॉट वापरण्यास सुलभ आणि सुरक्षापुर्ण असून त्यावर खालील बाबी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत….
– स्थान आधारित वैयक्तिक सेवा.
– अत्यंत सुलभ मेन्यू.
– गोपनीय तक्रार नोंद.
– जागरुकता मोहिम.
– बहुभाषिक साहाय्य.
– स्मार्ट सहाय्यक.
– द्विभाषिक उपलब्धता.
– अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार सुविधा.
– तत्काळ प्रतिक्रिया.
हे चॅट बॉट तयार करण्याकरिता के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक धनंजय कानडे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले आहे. हे चॅट बॉट आज (दि. १ सप्टेंबर) पासून प्रायोगिक तत्वावर नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात वापरण्याकरिता सुरु करण्यात आले आहे.

























