नाशिक – विशेष प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. कंत्राटी सफाई कामगार तसेच आरोग्य विभाग, चालक, व्हॉलमन, सिटी बस कंडक्टर, चालक आणि इतर विभागांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा आमदार देवयानी फरांदे आणि आमदार राहुल ढिकले यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित केला. त्यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडून राज्य शासनाचे लक्ष वेधले.
कंत्राटी कामगारांच्या पगारातून दरमहा ठराविक रक्कम वसूल करून कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या खिशात जात असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितलं. या संदर्भात तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जात असल्याचे आ. फरांदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात ‘एसीबी’ अथवा ‘एसआयटी’ यांच्यामार्फत चौकशी करून कष्टकरी कर्मचाऱ्यांना न्याय देणार का, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आश्वासन दिले आहे की, या सर्व प्रकरणांची लवकरच चौकशी केली जाईल. कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय दूर केला जाईल आणि त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने केलेली वसुली व दंड याची चौकशी केली जाईल. या गैरप्रकारात सामील असलेल्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. या आश्वासनामुळे नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण आता त्यांच्या समस्यांवर गांभीर्याने लक्ष दिले जाईल आणि त्यांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

























